Thursday, 18 October, 2007

ग्राहकांची काळजी हेच आमचे ध्येय!

९८९००९८९००..(दाबला.)
'वेलकम टु एअरटेल कस्टमर सर्व्हिस. प्रेस १ फॉर इंग्लिश, २ फॉर हिंदी, ३ फॉर मराठी'
३ (दाबला.)
'प्रीपेड माहिती साठी १ दाबा, रिचार्ज साठी २ दाबा, नवीन कार्ड च्या माहितीसाठी ३ दाबा.'
१ (दाबला.)
'अकाउंट बॅलन्स च्या माहितीसाठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा'
१ (दाबला.)
'ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा.'
....(काहीच नाही दाबले. काय दाबावे कळले नाही. 'वॉइस रिस्पॉन्स लावणार्याचा गळा दाबण्यासाठी ४ दाबा' असे पुढे आहे काय हो?)
'तुम्ही दाबलेला नंबर योग्य नाही.ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा, कॉल चालू असताना मागच्या मेनुकडे जाण्यासाठी ७ दाबा, कस्टमर सर्व्हिस शी बोलण्यासाठी ९ दाबा.'
९. (दाबला.आता नंबर दाबून दाबून मेंदूला थकवा आला आहे.)
'हॅलो वेलकम टु एअरटेल. हाउ कॅन आय हेल्प यु?'
(अरे चांडाळा,मराठीसाठी इतके आकडे मूर्ख म्हणून दाबले का लेका मी?)
'डु यु नो मराठी?'
'नो मॅम, आय कॅन ओन्ली अंडरस्टँड लिटल बिट ऑफ इट.कान्ट स्पीक.'
(अरे फुल्या फुल्या फुल्या, चुल्लूभर पानीमे डूब मर! मला इंग्रजी कामापुरती येत असली तरी इंग्रजीत कचाकचा भांडता येत नाही ना रे.त्याला मातृभाषाच बरी.'ओ, काय सर्व्हिस देता का झx मारता?' चा आवेश आंग्लभाषेत आणता येणारे का मला?)

पुढचा संवाद आंग्लभाषेतलाच,पण मूळ भांडणाची नीट मजा मिळावी म्हणून मराठीत देत आहे.
'मी अमुक तमुक, नंबर अमुक तमुक.मला आताच एस एम एस आला की मिस्ड कॉल ऍलर्ट सर्व्हिस दिल्याबद्दल आम्ही तुमच्या शिलकीतून १५ रु. कापून घेत आहोत.'
'थांबा मॅडम, मी चेक करतो, होल्ड ऑन.'
(नंतर सुमारे पाच मिनीटे 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन' हे एअरटेलचे संगीत.)
'हॅलो'
(परत 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन')
'हॅलो'
'यस मॅम, आम्ही शोधले. ती सर्व्हिस रिक्वेस्ट तुम्हीच दिली आहे.'
'मी एअरटेल प्रीपेड घेतल्यापासूनच्या तीन वर्षात कधीही अशी सर्व्हिस रिक्वेस्ट दिलेली नाही.'
'पण आमची सिस्टम म्हणते की तुम्ही तशी रिक्वेस्ट दिली.'
(च्या xxx ! तुझी सिस्टम घाल चुलीत मेल्या.)
'अहो पण मी तशी रिक्वेस्ट कधीच नाही केली, तसा फोन नाही केला, अशी सर्व्हिस हवी का विचारण्यार्या फोनला हो उत्तर नाही दिले, आणि असा एस एम एस नाही केला, आणि अशा एस एम एस ला उत्तरही नाही दिले.'
(मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले टाकली नाहीत, मी ती उचलणार नाही.)
'हे बघा मॅडम, आमच्या सिस्टम मधे स्पष्ट दिसतं आहे की तुम्ही अशी रिक्वेस्ट केली होती.'
'मी पण स्पष्ट सांगते आहे की मी अशी रिक्वेस्ट कधीच नाही केली. ही तुमच्या सिस्टमची चूक आहे.'
'हे पहा मॅडम, याबाबतीत मी काहीच करु शकत नाही.'
'तुम्ही म्हणता ना मी रिक्वेस्ट दिली, मग ती कोणत्या तारखेला आणि कोणत्या स्वरुपात दिली याची माहिती द्या.'
'सॉरी मॅडम, ही माहिती आम्ही डिसक्लोज करु शकत नाही.'
(अरे चोरा! आमची माहिती बरी विचारुन घेतोस फोन केल्या केल्या..आणि स्वतः माहिती देताना मात्र प्रायव्हसी पॉलीसी होय?)
'हे बघा, मी स्पष्ट सांगते आहे की अशी सर्व्हिस मी कधीच मागितली नाही आणि ती रद्द करा.आणि मला १५ रु. परत द्या.'
'सॉरी मॅडम. १५ रु. तर परत मिळणार नाहीत.तुम्ही ५११ ला 'एम सी ए कॅन्सल' असा एस एम एस करुन कॅन्सल ची रिक्वेस्ट टाका.'
(वा हे बरं आहे. तुम्ही नको त्या सर्व्हिस न विचारता द्या..रद्द करताना मात्र आम्हालाच तसदी द्या.तुम्ही कचरा करा, आम्ही झाडू मारतो.)
'नक्की रद्द होईल का?'
'असं करा मॅडम, तुम्ही चोवीस तासांनी परत फोन करुन ती कॅन्सल झाल्याचं कन्फर्मेशन घ्या.'
(घेते रे..करते काय न घेऊन?पैसे माझेच जाणार ना दर महिन्याला? चूक माझी नसली तरी मला ती सुधारायला तडफडायला पाहिजेच.)
एम सी ए कॅन्सल..५११..सेंड.
'युवर रिक्वेस्ट विल बी प्रोसेस्ड इन नेक्स्ट ट्वेंटी फोर अवर्स.'
(अय्या! कित्ती छान! खरंच ना पण?)

२४ तासांनी.
९८९००९८९००..(दाबला.)
'वेलकम टु एअरटेल कस्टमर सर्व्हिस. प्रेस १ फॉर इंग्लिश, २ फॉर हिंदी, ३ फॉर मराठी'
३ (दाबला.)
'प्रीपेड माहिती साठी १ दाबा, रिचार्ज साठी २ दाबा, नवीन कार्ड च्या माहितीसाठी ३ दाबा.'
१ (दाबला.)
'अकाउंट बॅलन्स च्या माहितीसाठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा'
१ (दाबला.)
'ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा.'
....(काहीच नाही दाबले. काय दाबावे कळले नाही. 'वॉइस रिस्पॉन्स लावणार्याचा गळा दाबण्यासाठी ४ दाबा' असे पुढे आहे काय हो?)
'तुम्ही दाबलेला नंबर योग्य नाही.ब्ला ब्ला ब्ला साठी १ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी २ दाबा, ब्ला ब्ला ब्ला साठी ३ दाबा, कॉल चालू असताना मागच्या मेनुकडे जाण्यासाठी ७ दाबा, कस्टमर सर्व्हिस शी बोलण्यासाठी ९ दाबा.'
९. (दाबला.)
'हॅलो.'
'मी असा असा एम सी ए कॅन्सल चा एस एम एस केला. आणि मिस्ड कॉल ऍलर्ट सेवा खरंच कॅन्सल झालीय का?'
'थांबा हं मॅडम. मी चेक करते.'
(नंतर सुमारे पाच मिनीटे 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन' हे एअरटेलचे संगीत.)
'हॅलो मॅडम, ती सर्व्हिस अजून तरी कॅन्सल झालेली नाही, पण चोवीस तासात नक्की कॅन्सल होईल.'
'नक्की होईल का? की चोवीस तासांनी परत हेच म्हणणार?'
'नही, तुम्ही कॅन्सल रिक्वेस्ट टाकली आहे ना? नक्की कॅन्सल होईल.'

दुसरा महिना:
'रुपीज १५ डिडक्टेड फ्रॉम युवर अकाउंट. थँक यु फॉर युजिंग एअरटेल मिस्ड कॉल ऍलर्ट सर्व्हिस.'
९८९००९८९००..
ब्लाब्लाब्ला..१ दाबा..२ दाबा..३ दाबा..
'हॅलो, मी अमुक तमुक, नंबर अमुक तमुक. मी मागच्या महिन्यात मिस्ड कॉल सर्व्हिस कॅन्सल चा एस एम एस केला होता आणि तुमच्या ग्राहक सेवेला फोन पण केला होता. त्यांनी सांगितले की ती रद्द होईल पण झाली नाही. या महिन्यात परत १५ रु.गेले.'
'थांबा हं मॅडम.मी चेक करतो.'
(नंतर सुमारे पाच मिनीटे 'टॅन टॅ टॅ टॅन, टडटड टॅन टॅन टडटडटडडा टॅन ट ट टॅन' हे एअरटेलचे संगीत.)
'हॅलो मॅडम, तुम्ही परत एकदा एस एम एस करा.'
'पण यावेळी नक्की रद्द होईल ना? आणि मागच्या वेळी रद्द होईल असे छातीठोकपणे सांगणारी तुमची प्रतीनिधी आता कुठे आहे?'
'आता हे काही मी सांगू शकत नाही.पण तुम्ही ५११ ला एस एम एस करा आणि चोवीस तासांनी एकदा फोन करा.'
परत एकदा एम सी ए कॅन्सल..

तिसरा महिना:
'१५ रु गेले आणि मिस्ड कॉल ऍलर्ट सर्व्हिस वापरल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.'
(का? का? माझ्याच बाबतीत असं का?)
९८९००९८९००
'१ दाबा..२ दाबा..३ दाबा..७ दाबा..९ दाबा..'
'हॅलो ब्ला ब्ला ब्ला.फोन केला होता...ब्ला ब्ला ब्ला... अजून कॅन्सल झाली नाही. तुमचे लोक काय करतात? आणि एस एम एस करण्याशिवाय रद्द करण्याचा दुसरा मार्ग नाही का? आणि रद्द झाल्याचा किंवा न झाल्याचा एस एम एस का येत नाही? युवर रिक्वेस्ट विल बी प्रोसेस्ड विदीन २४ अवर्स असा एस एम एस दर महिन्याला येऊनही काहीच का होत नाही? असं किती महिने चालणार?प्रत्येक वेळी कोणी ना कोणीतरी मला '२४ तासात नक्की रद्द होणार बघा' असं सांगून कटवणार.'
'हे पहा मॅडम. मागच्या महिन्यात तुम्हाला कोणी अटेंड केलं आणि काय सांगितलं ते मला माहिती नाही.'
'बाई निशा होती आणि पहिल्या वेळी अटेंड करणारा बाबा आसिफ होता'
'बरं. यावेळी तुम्ही एस एम एस करा. नक्की कॅन्सल होईल.'
यावेळी वैतागात बदल म्हणून कस्टमर सर्व्हिस ला ई पत्र पाठवले.
यांत्रिक उत्तरः 'तुमचे इमेल मिळाले आणि पुढच्या २४ तासात प्रोसेस केले जाईल.'
(ऑटो रिप्लाय..पलिकडचा माणूस इमेल वाचत नसला तरी त्याच्याकडून प्रोग्रामने पाठवलेले उत्तर मिळणार. 'एअरटेलकडून मला स्पर्धेत ताजमहाल बक्षिस मिळालाय. बक्षिस घ्यायला कधी येऊ?' म्हटले तरी 'तुमचे इमेल मिळाले आणि पुढच्या २४ तासात प्रोसेस केले जाईल.' उत्तर आणि 'हराxxx! हे मेल जो वाचेल त्याच्या नानाची टांग! मर मेल्या!' म्हटले तरी 'तुमचे इमेल मिळाले आणि पुढच्या २४ तासात प्रोसेस केले जाईल.'. उत्तर पाठवणार्या प्रोग्रामला तुमच्या अडचणींशी, आनंदाशी, दु:खाशी काही सोयरसुतक नाही.शिव्या दिल्या तर रागही नाही.आणि आतापर्यंत पाठवलेल्या ३ ईपत्रांना ऑटो रिप्लाय नंतर मानवी रिप्लायही नाही.ईपत्रे आपोआप 'स्पॅम फोल्डर' मध्ये पण जात असावीत एखाद्या प्रोग्रामने.हाय काय नि नाय काय! कोण तो वेडा सारखा तक्रारीची ईमेल करतोय? घर थंडीत बांधा रे त्याचं! यालाच 'विज्ञान: एक शाप' म्हणत असावेत काय?)

६ वा महिना..
'ब्ला ब्ला ब्ला..१५ रु गेले..कॅन्सल नाही झाली...'
'बरं. तुम्ही असं करा, यावेळी एम सी ए नो पाठवून बघा.'
एम सी ए नो.. ५११..
'हॅलो..ब्ला ब्ला..ब्ला..नाही झाले कॅन्सल..मेसेज फेल.'
'हे कोणी सांगितले? तुम्ही एम सी कॅन्सलच पाठवा.'
एम सी ए कॅन्सल.. ५११.. एमसीएकॅन्सल..५११..' 'एम सी ए नो'.. एमसीएनो..५११..२४ तासात रिक्वेस्ट प्रोसेस केली जाईल..'
'नक्की कॅन्सल होईल मॅडम.'
(कोण निर्बुद्ध xxxx गणंग घेतले आहेत रे कस्टमर सर्व्हिस मध्ये? दरवेळी 'अगदी नक्की' वाली आश्वासने देतात..दरवेळी काही करत नाहीत. मार्चमध्ये निशाशी बोलले, एप्रिल मध्ये आसिफशी बोलले,मे मध्ये सुरेशशी बोलले, जून मध्ये सिम्रनशी बोलले, आता अजून कोणकोण आहात ते या फोनवर. बोलून घ्या माझ्याशी.कॉल सेंटर मध्ये अमेरिकेतल्या माणसाशी मकरंदला मॅक होऊन आणि सविताला सॅली होऊन बोलावे लागते तसा कोणी विदेशी आयझॅक माझ्याशी आसिफ बनून बोलत नाहीये ना? का दरवेळी एकच आसिफ आणि एकच निशा वेगवेगळी माणसं बनून बोलत आहात?)

हा किस्सा गेले ७ महिना चालू आहे. दरवेळी 'एम सी ए कॅन्सल', 'एम सी ए नो' टु ५११..'नक्की रद्द होणार' ची आश्वासने.. 'कस्टमर सर्व्हिस' 'कस्टमर केअर' या गोंडस नावाखाली वावरणार्या या निर्बुद्ध अज्ञाताशी लढा देताना अस्मादिकांच्या तलवारी बोथट झाल्या आहेत. 'ग्राहक मंच' इ. माहित्या वाचून 'काही तरी केलं पाहिजे बुवा!' अशी स्फूर्ती येऊन दुसर्या क्षणी 'नको बाबा कोर्टाची पायरी!' म्हणून कच खाणे. 'काय बावळट आहेस. आयडीया सिमकार्ड घे.' ला 'मला फोन नंबर शक्यतो बदलायचा नाही' हे उत्तर, 'शंकरशेट रोड ला व्हेगा सेंटर ला जाऊन झापून या' वर 'व्हेगा सेंटर मध्ये जाऊन काचा फोडण्याची' स्वप्ने पाहणे, परत 'कस्टमर सर्व्हिस चे फोन व्हेगा सेंटरहून येतात की दुसरी कडून की बंगलोर की चेन्नईहून?' या अज्ञात शत्रूच्या ठिकाणाबाबतच्या शंकेने तलवारी गळून पडणे..
'जाऊदे मेलं. १५ गुणिले १२ म्हणजे १८० रु. जाऊदेत. पण हा दर वेळी मनस्ताप नको. हे पॅकेज संपल्यावर सरळ पोस्टपेड करुन टाकू नंबर तोच ठेवून.' असा भेकड विचार..
माझ्याकडे काय पुरावा आहे? ही माणसे 'मीच रिक्वेस्ट दिली' म्हणतात. मी कधीही कोणत्याही स्वरुपात दिली नाही हे मला माहिती आहे. पण माझ्याकडे मी ती दिली नाही याचे काय पुरावे आहेत? त्यांच्याकडे मी दिली याची काय पुरावे आहेत? असले तर सांगत का नाहियेत? हा काही स्कॅम आहे का? यात पूर्ण एअरटेल आणि एअरटेल ची डाटाबेस सिस्टम सामिल आहे का? दाद मागू कुठे? हे लचांड माझ्या मागे का लागावे? आता हे निस्तरायला कोणाला पकडावे? हे चोर एस एम एस पाठवूनही काहीच करत नाहीत हे कोणाला सांगावे?

'बसल्या जागी फोन करुन कामे होतात' हे सुख देणार्या ग्राहक सेवा खरंच सेवा आहेत का? काम नाही झाले तर प्रत्यक्ष अद्वातद्वा वचने देणार्या माणसांचे गळे पकडता येत नाहीत हा तोटा नाही का? समोरचा माणूस प्रत्येक वेळी वेगवेगळा असल्याने चुकीची माहिती देणार्याला ओळखता येत नाही हा तोटा नाही का? दरवेळी ऐकणारा माणूस वेगळा असल्याने आपले पूर्ण चर्हाट परत ऐकवावे लागणे हा तोटा नाही काय? 'बिचारे शिफ्ट मध्ये काम करणारे कॉल सेंटरवाले' अशी आश्वासने ड्रगच्या धुंदीत देऊन विसरुन जात असावेत का? पण सगळ्या ग्राहक सेवा अशा नसतात. सगळ्याच कॉल सेंटरमध्ये अनाचार चालत नाहीत..त्यांच्या आपल्या समस्या असतात..पण मग मला दर महिन्याला खोटखोटं सांगून पुढच्या महिन्यात १५ रु. जाईपर्यंत स्वस्थ का बसवतात?

कितीही सकारात्मक विचार करायचा म्हटलं तरी बरेचदा 'बाय हुक ऑर क्रुक' ने मोठे होणार्या या मोबाईल कंपन्यांबद्दल थोडी शंका येतेच. 'फटिचर, तू इतना सोचता क्यूं है रे?' असं म्हणून स्वतःला गप्प बसवते झालं.


Wednesday, 17 October, 2007

मनातील शब्दांची फुलपाखर

मनातील शब्दांची फुलपाखरे
मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली ...
आणि बघता बघता एक कविता जन्मास आली !

कविता जणू वाटत होती एखाद्या तान्ह्या बाळासारखी !
नुकतीच या अनोळखी जगात पाऊल ठेवलेली,
आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेणारी ...

मग वाटू लागली ती एखाद्या नववधू सारखी ,
थोडीशी बावरलेली, थोडीशी संकोचलेली...
आपण लोकांना आवडू की नाही या विचारात रमलेली !

कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणी सारखी,
आपल्या सुखात व दुःखात सहभागी होणारी ...
आपल्या भावना समजून घेणारी !

शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वतःचं व्यक्तिमत्त्व,
ती ही शोधत असते सगळ्यांमध्ये आपलं वेगळं अस्तित्त्व !

खास

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे.

Pariksha

Image Hosting

कॉफीची चव

त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते. ती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.
तो फार साधा. आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा. त्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच! तिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती!
पण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं, 'तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील?' तिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं. ती 'हो' म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं. या शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता!
जवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली. कॉफीची ऑर्डर दिली. पण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना! तो खुपच नर्व्हस झाला होता. आणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली. झक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या!
कॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला. त्यानं वेटरला हाक मारली. वेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला. तो म्हणाला, 'थोडं मीठ देता? मला कॉफीत टाकायचंय!' सारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं. विचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले. तीसुध्दा!
वेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - "कैसे कैसे लोग आते है!" अशा अर्थाचा चेहराही केला. त्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला! ती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ! अखेरीस तिनं विचारलंच "पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली?"
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला... "सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे. आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे. खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.
तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं. किती हळुवार होतं त्याचं मन. मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!
मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच आपला जीवनसाथी. तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता. मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं! चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले. एखाद्या परीकथेसारखे. खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं. ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा! आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या कॉफीत!
अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही. एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...!
काही दिवसांनी ती सावरली. रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली. एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली. त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.
"माझ्या प्राणप्रिये, मला माफ कर! आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही... केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती! त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे. आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...
खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती! पण मला तु खुप आवडतेस... आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो.
...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे. नाही तर हे खोटेपणाचं ओझं मी पेलू शकणार नाही! प्लीज - मला माफ करशील?"

MAst

Image Hosting

ek gammat

Image Hosting

Ticha Rumal

Image Hosting

Tuesday, 9 October, 2007

सखे, तुझ्यासाठी

बोलशील ना मज संगे, सखे तू
ऎकवशील ना ह्रुदयगीत मज एक दिन तू

आजकाल फ़ितुर झाली स्वप्नही तुला
राहशील ना त्या स्वप्नमहाली एक दिन तू

जपेन तुझ्या आसवांना मोत्यांसारखे
त्या शिंपल्याचा अवसर मज देशील ना तू

थांबवेन या काळाच्या प्रवाहाला
या अनोख्या संगमास देशील ना प्रत्यक्ष रुप तू

काळोख्या रात्री मी चंद्र पेटवत आहे
चांदणी बनून करशील ना मज सोबत तू

उधळेन आनंदाचे रंग सगळीकडे
त्या होळीचे निमित्त बनशील ना तू

बस,या फ़कीर मनाच्या खुप इच्छा नाही
फ़क्त चिरकाल साथ देणारी आठवण बनशील ना तू

Abhijeet

Abhijeet
Looking forward to express