Friday, 14 September 2007

खास

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे.

मनातील शब्दांची फुलपाखरे



मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली
...आणि बघता बघता एक कविता जन्मास आली !
कविता जणू वाटत होती एखाद्या तान्ह्या बाळासारखी !
नुकतीच या अनोळखी जगात पाऊल ठेवलेली,
आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेणारी ...
मग वाटू लागली ती एखाद्या नववधू सारखी ,
थोडीशी बावरलेली, थोडीशी संकोचलेली...
आपण लोकांना आवडू की नाही या विचारात रमलेली !
कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणी सारखी,
आपल्या सुखात व दुःखात सहभागी होणारी ...
आपल्या भावना समजून घेणारी !
शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वतःचं व्यक्तिमत्त्व,
ती ही शोधत असते सगळ्यांमध्ये आपलं वेगळं अस्तित्त्व !

Wednesday, 24 January 2007

अबोल प्रेम

हे फक्त माझ्याचसोबत
नेहमी असंच घडणार आहे?
तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट
'ते' न बोलताच संपणार आहे?

भेट-वेळ रोजची ठरलेलीच
तरी अजून काय ठरणार आहे?
बोलायचं पटकन पण वेडं मन
त्याचाही मुहुर्त पाहणार आहे !

भेटतो तेव्हाच माहित असतं
निघायची वेळ येणार आहे
पटकन विचारावा प्रश्न हवासा
तर शब्द ओठीच अडणार आहे !

मी न विचारताच तू काय
हवं ते उत्तर देणार आहे?
हे पुरतं कळतंय तरीही
तोंड माझं का बोलणार आहे?

न बोलता बोललेले शब्द
तुला वेड्याला कळणार आहे?
मी बोलले/न बोलले तरी गप्पच
नेहमीसारखा तू राहणार आहे !

भावभावना समजून घेणं
सगळंसगळं थांबणार आहे
उष्ट्या कुल्फीची चव मात्र
जिभेवरती रेंगाळणार आहे

स्वप्न माझं हे संपलं तरीही
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसले तरी
माझ्यात तूच सापडणार आहे !

Abhijeet

Abhijeet
Looking forward to express