Friday 5 January, 2007

गुन्हा

म्हणून मी स्वतःला
कामाच्या ढिगात गाडतो
तुझ्या आठवणींच्या भुतांना
दूरदेशी धाडतो

चुकून आज चूक झाली
विसर पडला या गोष्टीचा
भरल्या जखमेतल्या रक्तालाही
मोका मिळाला बंडखॊरीचा

कोमेजल्या फुलांनाही
मंद गंध दरवळतोय
दिवससुद्धा आज दुष्टपणे
रात्रीला हुलकावतोय

उष्ण उन्हाळी वारेसुद्धा
श्वास तुझाच घेउन आलेत
आज पुन्हा तेव्हासारखे
सगळे तुलाच सामील झालेत

का मला तू एकटयाला
स्वस्थ बसू देत नाहीस?
माझ्या एकटेपणालाही
एकटे म्हणून सोडत नाहीस?

विसरून गेलीस तू होते काही
थोडे फार जे काही
आठवणींच्या तुरुंगात
खुशाल मला टाकून देई

सुटकाही होत नाही
शिक्षाही संपत नाही
का कधी न केल्या गुन्ह्याला
कसलीच क्षमा नाही?

No comments:

Post a Comment

Abhijeet

Abhijeet
Looking forward to express