Wednesday, 24 January, 2007

आयुष्य असंच जगायचं असतं!

जे घडेल ते सहन करायचं असतं,
बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

कुठून सुरू झालं हे माहीत नसलं,
तरी कुठे थांबायचं हे ठरवायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

कुणासाठी काहीतरी निस्वार्थीपणे करायचं असतं,
स्वत:च्या सुखापेक्षा इतरांना सुखावायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

दु:ख आणि अश्रूंना मनांत कोंडून ठेवायचं असतं,
हसता नाही आलं तरी हसवायचं मात्र असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

पंखांमध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं,
आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी,
'मागून मागून काय मागितलंस', असंच म्हणायचं असतं,
आयुष्य असंच जगायचं असतं!

No comments:

Post a Comment

Abhijeet

Abhijeet
Looking forward to express